होय, धनंजय माने इथेच राहतात.


होय, धनंजय माने इथेच राहतात. 

         धनंजय माने सध्या कुठे राहतात ? असा प्रश्न कधी आलाय का तुमच्या डोक्यात ? प्रश्न थोडा विचित्र आहे पण काही क्षण विचार करून पहा. चित्रपटात धनंजय माने आणि त्यांचे मित्र पाषाण रोड वरच्या, लीलाबाई काळभोर यांच्या बंगल्यात भाड्याने राहत होते. ते जर खऱ्या जगात असते तर आज ३० वर्षानंतर ते नक्कीच कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट झाले असते. मला असं वाटतं ते खरंच शिफ्ट झालेत.. आताच्या जगात धनंजय माने आणि कंपनी आपल्याला आसपास नेहमी जाणवत असतात. भुताटकीच्या रुपात नाही हा.. लाक्षणिक अर्थाने.. उदाहरण द्यायचं झालं तर
एके दिवशी माझ्या एका मित्राने, श्रीधर इंगवले ने माझा दुसरा मित्र राहुल पाध्येचा डबा त्याला न विचारता खाल्ला. त्यावर चिडून राहुल, श्रीधरला म्हणाला “हा हलकटपणा आहे माने” श्रीधर इंगवलेला योग्य तो संदेश पोहोचला... त्यावर श्रीधर, राहुलला म्हणाला, “तुम्ही आमचे डबे खाता ते... कॉन्ट्रीचे २०० रुपये अजून दिले नाहीत ते” हे बोलून दोघे हसायला लागले...
ऑफिसमध्ये टाईमपास करणारे दोन कर्मचारी
कर्मचारी १ : हा सनी लियोनीचा नवा डान्स बघ ना..
कर्मचारी २: मोबाईल खाली कर, (बॉसला उद्देशून) तो टूकलू बघेल ना येड्या...
फेसबुकवर
पोस्ट – अमुक तमुक नेत्याने रोड दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलेलं आहे .
भाष्य करणारा – करतोय तो.. वाट बघा..
मोबाईलवर बोलताना 
मित्र  : कोण कोण आहात तिथे ?
कामगार : मी आणि ज्याला बायकोने टाकलंय तो 
मित्र  : बायको कोण ?
कामगार : सुपडी
मित्र  : आणि तो कोण?
कामगार : कचरा  
कॅन्टीनमध्ये:
प्रियकर : चल, प्लाझाला जाऊ फिल्म बघायला 
प्रियसी : सारखं सारखं त्याच थेटरात काय !
इतकंच काय तर इज्राइलचं नाव ऐकताच डोळ्यापुढे येतं ते म्हणजे डायबेटीजची औषध आणि ते वारलेले ७० रुपये... अभ्यासाचा देखावा करणाऱ्याला ‘शंतनू’ म्हणून चिडवलं जातं. लुक्ख्या मजनूना “तिचा बाप तुला बाजारमास्तर म्हणून हि ठेवणार नाही”. म्हणत खिल्ली उडवली जाते.. “तुमचा जोडा खूप चांगला आहे, तोंडात मारण्यासारखा..” अशा कमेंट्स नवविवाहितांच्या पोस्टवर सर्रास आपण वाचतो. मित्रांच्या ढेरीने एकदा तरी “कुणी तरी येणार येणार गं” चा तडाखा खाल्लेला असतो...      
          तात्पर्य काय... एक चित्रपट, त्यातील व्यक्तिरेखा लोकांना इतक्या आवडतात  कि इतक्या वर्षांनी हि लोक त्या चित्रपटाचे संवाद रोजच्या आयुष्यात सहज म्हणून वापरतात. त्या संवादांनी योग्य तो संदेश हि पोहोचतो आणि बोलण्यात एक व्हरायटी हि येते.... “अशी हि बनवाबनवी” या चित्रपटाने मराठी रसिक मनात जे विनोदाचे बियाणे पेरले आहे त्याची फळ आपल्याला आज हि चाखायला मिळतात. म्हणूनच मला असं वाटतं कि धनंजय माने आणि कंपनी त्या पाषाण रोड च्या बंगल्यातून शिफ्ट होऊन चाहत्यांच्या विनोदबुद्धीमध्ये कायमचे राहायला आलेले आहेत.  
        मित्रांनो तुम्हाला जर हा लेखनप्रपंच आवडला असेल तर माझा ब्लॉग नक्की शेयर करा. याविषयी तुमच्या मनात आलेल्या कल्पना, तर्क कमेंटमध्ये जरूर लिहा. खुश रहा..फिल्मी रहा.   
-    फिल्मी शिंदे

Share on Google Plus

About Sushant Shinde

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.

0 comments :

Post a Comment